जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (दि.8) शनिवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार होते, मात्र पोलीसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
यापूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावक-यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलीसांनी त्यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्याबाबत आल्याची माहिती समोर येत आहे.
सगे-सोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी यापूर्वीच उपोषणाला बसणार असल्याचे ठरवलं होतं. पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने त्यांना आंदोलन करता आले नाही. त्यामुळे त्यांनी 8 जून रोजी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते.
मनोज जारांगे यांच्या गावानेच त्यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. अंतरवली सराटी गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला विरोध केला असून जरांगेंच्या उपोषणामुळे गावात मोठी गर्दी होते, याशिवाय जातीय सलोखा बिघडतो. त्यामुळे त्यांना उपोषण करण्यापासून रोखावं अशी विनंती ग्रामस्थांनी 3 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिका-यांनी घेतल्याचे समजते.