नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एनडीएने बहुमत सिध्द करुन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. नवीन सरकार येण्याआधीच राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक मोठी बातमी समोर येत आहे. नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला असून, पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. घुसखोरी करणाऱ्या तिघांना सीआयएसएफकडून अटक करण्यात आली आहे. या कामगारांनी एकाच आधार कार्डचा वापर करुन प्रवेश केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या संशयितांना संसद भवनातील एका प्रवेशद्वारापाशी सुरक्षा आणि ओळखपत्रांच्या तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आलं. बनावट ओळखपत्र दाखवून संसद भवनात प्रवेश करण्याचा त्या तिघांचा कट असल्याची बाब तपासातून समोर आली. ओळखपत्र तपासत असतानाच CISF च्या जवनानां त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. ज्यानंतर हे पुरावे खोटे असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने संशयितांना ताब्यात घेत सदर परिसरात सुरक्षेचा बंदोबस्त वाढवला.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 4 जून रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफने कासिम, मोनिस आणि शोएब या तीन मजुरांना पकडले. त्यांच्यावर कट रचणं आणि फसवणूक अशा आरोपांअंतर्गत भारतीय दंडसंविधआनाअन्वये विविध कलमांअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला.