लोणी काळभोर (पुणे) : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने बारामती ,दौंड, शिरूर हवेली तालुक्याच्या काही भागातील गावांमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. तर चोरट्यांच्या टोळ्यांकडुन चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या चर्चा देखील ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत. परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
हे ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात, हे समजत नसल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलीस गावा गावात जाऊन गस्त घालत आहेत. परंतु, ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. हे ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा शोध घ्यावा, अशी मागणी आता जिल्ह्यातील नागरिक करत होते.
सध्या दिवसा व रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात हमखास घरफोडी चोरी होऊन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करून रोख रक्कमेची चोरी केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. या घटना आता फक्त काही तालुक्यांपुरता मर्यादित न राहता पूर्ण जिल्ह्यात घडत आहेत. जिल्ह्यात एक चोरी झाली की दुसरी चोरी घडल्याची घटना समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून हे ड्रोन नसल्याचे सांगत शिकाऊ विमान विमान असल्याचा दाखला देत नागरिकांचे तोंड बंद केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात रात्रीस चोरट्यांकडून हा खेळ सुरू आहे.
तसेच हे ड्रोन आकाशात उडत असताना इतर ड्रोनप्रमाणे यांचा आवाज हा अतिशय कमी प्रमाणत येत आहे. गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हे ड्रोन उडत असल्याने खूप कमी नागरिकांना हा प्रकार लक्षात येतो. परंतु व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून नागरिक सावध आहेत. त्यामुळे या ड्रोनचा जो उद्देश असेल तो काही यशस्वी होताना दिसून येत नाही.
चोरटे घरफोडी करत चोरी करुन प्रसार होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. दरम्यान गावात रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे घरासमोरून फिरत असल्याचे अनेक नागरिकांना दिसत आहे. चोरटे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत? तसेच त्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ते ड्रोन कॅमेराचा वापर करीत असावेत, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. हे ड्रोन कॅमेरे आहेत का आणखी दुसरे काही याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, ड्रोनबाबत पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधल्यास घाबरण्याचे कारण नसून ते शिकाऊ विमानाच्या लाईट्स असल्याचे सांगत पोलीस आपली जबाबदारी झटकत आहेत. ड्रोन दिसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिसरात घरफोड्या झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीस या ड्रोनचा शोध लावण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
दरम्यान बारामतीच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रात्री फिरणाऱ्या ड्रोनबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोनवरून या ड्रोन उडवणाऱ्या आरोपींचा व घडणाऱ्या घटनांचा लवकरात लवकर तपास लावावा, अशा सूचना दिल्या आहेत.
संशयित तीन चोरट्यांकडे भगव्या कलरची डूक स्पोर्ट बाईक आहे. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते. तर मागच्या दोघांनी तोंडाला मफलर गुंडाळला होता. तिघांनीही जिनची पँट्स व अंगावर स्पोर्ट जॅकेट घातले होते. त्यांच्या खांद्यावर पांढऱ्या बॅग व हातातील कपड्यात गुंडाळलेली काहीतरी घातक वस्तू असण्याची शक्यता आहे. हे १०० टक्के दिवसा फिरून रेकी करीत आहेत. त्यामुळे त्यांना कुठे कॅमेरे आहेत, याची संपूर्ण माहिती असल्याने ते त्या ठिकाणाहून गाडी जोरात घेत आहेत. त्यामुळे रात्री ड्रोनच्या माध्यमातून घरफोड्या करणारे संशयित चोरटे असावेत. नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. काही अडचण आल्यास माझ्याशी अथवा लोणी काळभोर पोलिसांची त्वरित संपर्क करावा.
युवराज काकडे (ग्रामपंचायत सदस्य – थेऊर, ता. हवेली)
जिल्ह्यात ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी दिलेली आहे. त्या अनुषंगाने नागपूरवरून तांत्रिक विशेष तज्ञांची टीम बोलावली होती. त्या टीमने नागरिकांना प्रात्याक्षिके करून दाखविली आहे. ड्रोन व विनामातील फरक सांगितला आहे. बारामतीतील रेड बर्ड फ्लाईंग अँड ट्रेनिंग सेंटरमधील विद्यार्थी रात्रीच्या वेळेस आकाशात विमान उडवीत आहेत. मात्र, आकाशात खूप दूर अंतरावरील विमान नागरिकांना अधिक जवळ वाटते. ड्रोन ऑनलाईन पद्धतीने कोणीही मागवू शकतो. हे ड्रोन जर विनापरवाना आकाशात घिरट्या घालत असतील, तर त्याला प्रतिबंधक उपाय म्हणून लवकरच अँटी ड्रोन गन खरेदी करण्यात येणार आहे.
पंकज देशमुख ( पोलीस अधीक्षक – पुणे जिल्हा ग्रामीण)वैमानिक प्रशिक्षणाची विमाने ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन आकाशात भरारी घेतात. रात्री आकाश निरभ्र असते. त्यामुळे विमान प्रशिक्षणासाठी ती योग्य वेळ असते. प्रशिक्षणार्थी विमान हे कमीत कमी ११० किलोमीटर तासी वेगाने चालवतात. त्याला जाग्यावर वळता येत नाही. मागील दोन दिवसांपासून प्रशिक्षणार्थी विमाणाची उड्डाणे बंद केली आहेत. त्यामुळे आकाशात घिरट्या घालणारी व नागरिकांना दिसणारी आमची विमाने नाहीत.
प्रफुल्ल तावरे (संचालक – कार्व्हर एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेड, बारामती)