पाचगणी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षांची निवडणूक हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि शहरात वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क वृक्षांची निवडणूक घेतली. पालिकेने स्थानिक, मूळ वृक्षांच्या निवडीवर आधारित निवडणुकीसाठी वृक्षांच्या यादीसह मतपत्रिका तयार करून नागरिकांना देण्यात आल्या आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसार एका झाडाला मतदान करण्याची संधी दिली गेली. निवडणूक बॅलेट पेपर आणि EVM मशीन या दोन पध्दतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणूक कार्यक्रमात नागरिकांना शहरात लावायच्या झाडांच्या जाती निवडण्यासाठी मतदान करण्याची संधी देण्यात आली. या निवडणुकीला शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
अनेक नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन आपल्या आवडीनुसार झाड निवडले. मतदानात सर्वाधिक मते मिळालेल्या झाडाच्या जातीची निवड करण्यात आली. निवडलेल्या झाडांच्या यादीमध्ये सिल्व्हर ओक, पिसा, आसाने, गेला, वड, हिरडा, शिसम या स्थानिक वृक्षांचा समावेश करण्यात आला होता. हि निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत एकूण 1790 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत सिल्व्हर ओक या वृक्षाने सर्वाधिक 985 मते घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.वड-215, आसाने-179, शिसम- 143, हिरडा-107, पिसा-89, गेळा-72 अशी मते मिळाली.
या कार्यक्रमात पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, परवीन मेमन, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्षा नंदिनी बुटाला, नगरसेवक प्रविण बोधे, उज्वला महाडिक, रुपेश बगाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे, कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे, बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, संगणक अभियंता प्रशांत सरोदे, विवाह नोंदणी प्रमुख जयंती गुजर, रोखपाल राजेश्री सणस, शहर समन्वयक ओंकार ढोले, स्वयंप्रभा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रध्दा दर्यापूरकर, अजिंक्य कासुर्डे, अतुल राऊत, अनिल येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडलेल्या झाडांची लागवड शहरातील विविध ठिकाणी करण्यात येणार असून पालिकेच्या वतीने योग्य देखभाल करण्यात येणार आहे.