लोणी काळभोर : विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अचानक चक्कर आल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका मंगल कार्यालयात सोमवारी (ता. ३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मनोहर किसन दांगट (वय-५०, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील एका प्रसिद्ध मंगल कार्यालयात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड परिसरात राहणाऱ्या एका मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
वधू वरांना शुभार्शिवाद देण्यासाठी शेकडो नातेवाईक या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. या विवाह सोहळ्यासाठी मनोहर दांगट हे सुद्धा आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर पाहुणे मंडळी कार्यालयात जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, मनोहर दांगट यांना अचानक चक्कर आली. ते जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले.
मनोहर दांगट यांच्या नातेवाईकांनी तत्काळ त्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र मनोहर दांगट यांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. मनोहर दांगट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत. या दुख:द घटनेमुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
‘डीजे’च्या आवाजाने मृत्यू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा
कुंजीरवाडी येथील विवाह सोहळ्यात तब्बल 2 तासाहून अधिक काळ डीजेचा कर्णकर्कश आवाजात वाजत होता. डीजेचा आवाज मनोहर दांगट यांच्या कानावर पडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. 15 मिनिटानंतर त्यांच्या छातीत धडधड होऊ लागले. विवाह सोहळा संपन्न झाला. पाहुणे मंडळी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यातच मनोहर दांगट हे अचानक जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनोहर दांगट यांना ‘डीजे’चा आवाज सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.