पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये कोयता गँगने दुकानांची आणि वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. तर तीन विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत (वय-२६, रा. शिवसेना भवनजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले (वय-२२, रा. संजुदा कॉम्प्लेक्स, पापडेवस्ती, फुरसुंगी) आणि माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या (वय-१९, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील भेकराईनगर येथे शंभू फॉरमेन्स या नावाने दुकान आहे. या दुकानासमोर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्राने दुकानाच्या काचा फोडल्या. त्याचसोबत दुकानासमोरून जाणाऱ्या बसच्या काचा फोडलया आणि ढमाळवाडी येथील ७ ते ८ वाहनांची तोडफोड केली.
याप्रकरणी बुधवंत यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी कोयता गँगविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. दरम्यान, आरोपींचा तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेत दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करीत आहेत.