वाघोली, (पुणे) : पुणे-नगर महामार्गावर पेरणे फाटा टोल नाक्याजवळ पाथर्डी-मुंबई बस दुभाजकला धडकून सुमारे २० ते २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामधील चालकासह १४ प्रवाशांवर वाघोली, हडपसर आणि मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शनिवारी (दि. ०१ ) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी-मुंबई बस नगर येथून पुण्याकडे निघाली होती. पेरणे फाटा येथे बसच्या पुढे लोखंडी सळ्या असलेला ट्रक होता. त्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने त्या ट्रकची धडक वाचविण्यासाठी बस दुभाजकाला धडकली. अनेक प्रवासी झोपेत होते. बस धडकल्याने प्रवाशांना पुढील सीटचा तोंडाला जबर मार लागला. काही प्रवासी सीटमध्ये अडकून पडले होते. मागील सीट पुढील सीटवर आदळले. या अपघातावेळी बसमध्ये सुमारे 38 प्रवासी होते.
यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून अपघाताची माहिती मिळताच घटना लोणीकंद पोलीस, वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील तसेच सीट खाली अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून वाघोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वाघोली येथील खासगी रुग्णालयात ११, हडपसर येथील रुग्णालयात १ रुग्णांवर तर एसटी चालकावर मुंबई येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पाथर्डी येथील एकाच कुटुंबातील सहाजण जखमी
या अपघातात पाथर्डी येथील संदीप ज्ञानोबा सानप हे पत्नी दोन मुले व मेहुणीसह मुंबई येथे जाण्यासाठी प्रवास करत होते. या अपघातात हे सर्व जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाघोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.