यवत: संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील कागदपत्रे स्थानिक पातळीवरच जमा करा, असे आदेश दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी तालुक्यातील तलाठ्यांना यांना दिले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत हयात असलेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत ५० वर्षांवरील लाभार्थ्यांना दर ५ वर्षांनी उत्पन्न दाखला देणे सक्तीचे आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने हयातीचे व उत्पन्नाचे दाखले लाभार्थ्यांना जमा करणे शक्य झाले नाही.
तसेच सध्या ४० अंश सेल्सिअसच्या तापमान असल्याने वयोवृध्द लाभार्थ्यांना उष्माघातचा त्रास होवू शकतो. यामुळे गाव पातळीवरच तलाठी कार्यालयात लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार लिंक, बँक पासबुक, आधारकार्ड जमा करून घ्यावेत. पुढील आदेशानुसार जमा झालेले कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावेत , कोणत्याही लाभार्थ्यांस तहसिल कार्यालयात पाठवू नये व याबाबत प्रसिद्धी गाव पातळीवर देणेत यावी, अशा सूचना दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दिली आहे.
यवत परिसरातील जवळपास ५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रे यवत तलाठी कार्यालय येथे जमा केले आहे. यवत परिसरातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रे यवत तलाठी कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन यवतचे तलाठी अर्जुन स्वामी यांनी केले आहे.