लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांच्या टोळीने एका व्यापाऱ्याला कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात शुक्रवारी (ता.24) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश कामठे, विनय ससाणे, कृष्णा लोया, अक्षय कांचन, प्रतिक कांचन, प्रकाश खोले व त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओम कृष्णा गुरुंग (वय २२, रा. ग्रिन रोड पॉवर वस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम गुरुंग हे एक हॉटेल व्यवसायिक आहेत. हॉटेल व्यवसायाच्या धंद्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, फिर्यादी ओम गुरुंग यांना आरोपी ऋषीकेश कामठे याने हडपसर येथील १५ नंबर येथे शुक्रवारी (ता.24) भेटण्यासाठी बोलावले होते. फिर्यादी ओम गुरुंग व त्यांचे मित्र पार्थ सातपुते असे दोघेजण खराडी येथुन हडपसरकडे भेटण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांना सिरम कंपनीच्या मैदानाजवळ आरोपी कृष्णा लोया भेटला.
आरोपी कृष्णा लोया याने सांगितले की, ऋषीकेश कामठे भेटण्यासाठी येत आहे, असे म्हणुन १५ नंबर येथील एस. कुमार वडेवाले हॉटेलसमोर घेवून गेला. त्यानंतर त्या ठिकाणी ऋषीकेश कामठे व विजय ससाणे हे दोघेजण आले. ऋषीकेश कामठे याने फिर्यादी ओम गुरुंग यांना दमदाटी केली आणि म्हणाला तू गायी, म्हशी पकडण्याच्या नावाखाली पैसे खात आहेस, अशी आम्हाला बातमी मिळाली आहे. तुला राहायचे आहे की नाही? असे म्हणून फिर्यादींच्या मोबाईलची तपासणी केली.
त्यानंतर आरोपी ऋषीकेश कामठे, विजय ससाणे, कृष्णा लोया यांनी फिर्यादी ओम गुरुंग व त्यांचा मित्र पार्थ यांना लोणीकाळभोर येथील भवानी माता मंदीर येथे घेवून गेले. तेथे आरोपींचे आणखी दोन अनोळखी मित्र आले. कृष्णा लोया याने फिर्यादी यांचा मित्र पार्थ सातपुते यास अलीकडेच थांबवून घेतले. तर उर्वरित आरोपींनी फिर्यादी ओम गुरुंग यांना तुझ्याशीच बोलायचे आहे, असे म्हणत त्यांना एमआयटी कॉलेजच्या पाठीमागील मोकळया जागेत घेऊन गेले. तू गायी-म्हशींची पैशांची भाड खातो, असे म्हणुन फिर्यादी यांना त्यांनी कमरेच्या पट्टयाने व लाथा बुक्क्यांनी हात, पायावर, छातीत, पाठीत, डोक्यावर मारहाण करुन जखमी केले.
दरम्यान, अर्ध्या तासानंतर आरोपी अक्षय कांचन व प्रतिक कांचन हे दोघेजण तेथे आले व फिर्यादींना म्हणाले, तूच अक्षयकडे पिस्टल असल्याची टीप पोलीसांना दिली आहेस, असे म्हणत त्या दोघांनी कमरेच्या पट्ट्याने पुन्हा फिर्यादी यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी ओम गुरुंग यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच प्रकाश खोले याच्या मित्राने फिर्यादींच्या जवळ असलेला युबॉन कंपनीचा ब्लुटुथ हेडफोन काढून घेतला. तसेच ऋषीकेश कामठे याने जबरदस्तीने 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ओम गुरुंग यांना रात्री बारा वाजेपर्यंत बसवून ठेवले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय बागवे करीत आहेत.
तडीपार गुंडाची दहशत
लोणी काळभोर, उरुळी कांचन व हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय कांचन याच्यावर ५ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीवृत्तीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अक्षय कांचन याच्यावर कायद्याचा वचक बसावा, यासाठी पोलिसांनी तडीपाराचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपी अक्षय कांचन याला सन २०२३ साली पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपार असतानासुद्धा आरोपी अक्षय कांचन व त्याच्या टोळीने लोणी काळभोर येथे हॉटेल व्यावसायिकाला लुटले. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा दहशत पसरली असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपी अक्षय कांचन व त्याच्या टोळीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने काय कारवाई केली जाणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अहमदनगरला असतानाही पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा लोणी काळभोर पोलिसांचा डाव आहे. याआगोदरही पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तडीपार केले आहे, असा आरोप अक्षय कांचन याने केला आहे. तसेच या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे, असं देखील त्याने म्हटले आहे.