सातारा : पुण्यातील कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा सुरेंद्र अगरवाल यांचा सातारा जिल्हा प्रशासनाकडून महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आला आहे. हा बार अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अडचणीत आलेल्या अगरवाल कुटुंबीयांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर उभा असल्याचे समोर आले आहे. यामध्ये जर काही अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरूवारी माध्यमांशी संवाद साधत महाबळेश्वर मधील हॉटेलप्रकरणी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल याच्या कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधले असेल तर त्यावर बुलडोझर फिरवावा. अशा कारवाईच्या सूचना पोलीस, पालिका प्रशासनाला दिल्या.
MPG क्लबचा बार अखेर सील
महाबळेश्वरमध्ये सुरेद्रकुमार अगरवाल यांच्या नावाने महाबळेश्वर पारसी जिमखान्यामध्ये क्लब आणि रिसॉर्ट आहे. या क्लबबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क पथकाने चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने MPG क्लबचा बार अखेर सील करण्यात आला आहे.