पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीला पेटवून दिल्याची घटना घडली आहे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डीझेल टाकत पेटवून दिले. यामध्ये भाजून गंभीर जखमी झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाला आहे. आरोपी पतीवर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी 29 मे रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास गणपती माथा येथे घडली आहे.
पूजा प्रविण चव्हाण (वय-26 रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती प्रवीण बाबासाहेब चव्हाण (वय-26) याच्यावर भादंवि कलम 302, 498अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पूजा चव्हाण यांचा भाऊ अमोल भाऊराव पवार (वय-26 रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी प्रवीण चव्हाण याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर प्रवीणने पूजाला त्रास देण्यास सुरुवात केली. तो पुजाला सतत घरगुती कारणावरुन मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. बुधवारी 29 मे रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी प्रविण याने पत्नी पूजाला मारहाण करत तिच्या अंगावर डिझेल टाकून तिला पेटवून दिले. यामध्ये भाजून पूजा गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतु, तिचा मृत्यू झाला. आरोपी प्रवीण चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे करीत आहेत.