औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथील जुन्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.२७) घडली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येळी येथील गोपीचंद मारुती आव्हाड (वय ३०) यांचा गावातील अंकुश नागरे यांच्यासोबत वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत होत्या. या वादानंतर सोमवारी (दि.२७) सायंकाळी गोपीचंद हे त्यांच्या घरासमोर उभे असताना अंकुश नागरे व अन्य दोघेजण तेथे आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीस सुरुवात झाली. या हाणामारीत अंकुश नागरे, मारुती पांडुरंग नागरे, बाबाराव सोपान नागरे या तिघांनी गोपीचंद यांना काठीने पायावर, हातावर, पाठीवर जबर मारहाण केली.
यामध्ये गोपीचंद हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुरेश दळवे, औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिले, जमादार संदीप टाक, गजानन गिरी, कुठे, ठाकरे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या गोपीचंद यांना उपचारासाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याने घोषित केले.
या प्रकरणी रामप्रसाद आव्हाड यांनी मंगळवारी (दि.२८) औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून अंकुश सोपान नागरे, मारुती सोपान नागरे, बाबुराव सोपान नागरे यांच्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जी.एस. राहिले, जमादार टाक पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.