केडगाव: दौंड तालुक्यातील गरदडे वस्ती येथील परिसरात दुर्गंधी पसरल्याने गावातील आबासाहेब चोरमले व जगदीश गरदडे यांनी पाहणी केली. तेव्हा तेथील शेतकरी लक्ष्मण गरदडे व सर्जेराव गरदडे या शेतकऱ्यांच्या बांधावरती गुरुवार 30 मे रोजी दुपारच्या सुमारास बिबट्या कुजलेल्या अवस्थेत सापडला. या बिबट्याची लांबी अंदाजे साडेपाच व उंची अडीच फुटापर्यंत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मृत अवस्थेतील बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. आबासाहेब चोरमले यांनी संबंधित घटनेची माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
गरदडे वस्ती व खोपोडी परीसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक वेळा शेतकरी वर्गाला या बिबट्याचे दर्शन घडले आहे. चार दिवसांपूर्वी देखील याच परिसरात बिबट्या दिसला होता. संबंधित बिबट्या विषबाधा अथवा उपासमारीमुळे मृत पावला असावा, असे मत खोपोडी गावचे सरपंच वैशाली गरदडे यांनी व्यक्त केले.