नाशिक : निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावरील ढेपले वस्तीवर शेततळ्यात बुडून अल्पवयीन भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ढेपले वस्तीवर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हि घटना घडली. प्रेमकुमार गोकुळ ढेपले (वय-१५) आणि प्रतीक गोकुळ ढेपले (वय-१३) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक महती अशी कि, प्रेम आणि प्रतीक हे दोघेही वैनतेय विद्यालयात शिक्षण घेत होते. विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी हे दोघेही गेले होते. बराच वेळ होऊनही मुले का परत आली नाहीत, हे पाहण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ गेली. परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय, अशी शंका कुटुंबातील व्यक्तींना होती.
त्यामुळे त्यांनी जवळपास शोध घेतला असता शेजारील शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, शेततळे काठोकाठ भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचविण्याची संधी मिळू शकली नाही.
मोटर चालू करण्यासाठी गेले शेततळ्यावर
मोटर चालू करण्यासाठी हे दोघे भाऊ शेततळ्यावर गेले होते. यावेळी यातील एकजण मोटर चालू करण्यासाठी पोलावर चढला असता त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. यावेळी दुसऱ्याने शेततळ्यात पडलेल्याला वाचविण्याचे प्रयत्न केले असता तोही शेततळ्यात पडला. या दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, यानंतर कुटुंबियांनी तात्काळ दोघांनाही निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर उपसजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाणार आहेत.