पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातील तीन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. हे तीनही ससूनचे कर्मचारी सध्या अटक असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये दोन डॉक्टर, तर एक सफाई कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यापैकी डॉ. अजय तावरे यांच्याकडे असलेला कार्यभार काढून घेण्यात आला आहे. ससूनमधील अजय तावरे, श्रीहरी हरनोळ, अतुल घटकांबळे या तिघांचंही निलंबन करण्यात आलं असून आज (बुधवारी २९ मे ) सायंकाळी निलंबनाचे पत्रक निघणार असल्याची माहिती आहे.
ससून रूग्णालायाचे डीन विनायक काळे म्हणाले की, डॉ. अजय तावरे यांच्याकडील विभागप्रमुख पदाचा कार्यभार काढून घेतला असून त्यांच्याजागी आता डॉ. विजय जाधव यांच्याकडे तो सुपुर्द करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला आहे. तसेच, तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ केल्याने त्यांची ‘एसीबी’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर या दोघांचे निलंबन करण्याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, पोलिसांनी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमवाढ केली आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.