भिगवण : भिगवण व भिगवण परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. मागील तीन चार दिवस भिगवण व भिगवण परिसरात ड्रोन कॅमेरे अवकाशात रात्री फिरत असल्याने नागरिकांनी या ड्रोनची चांगलीच धास्ती घेतली आहे.
अवकाशात ड्रोन कॅमेरे फिरताना भिगवण येथील काही तरुण वर्गाने तसेच गावातील ग्रामस्थांनी पाहिले आहे. घरापासून सुमारे 300 ते 400 फूट उंचीवरून ते फिरत असून ‘लेझर लाईट’ प्रमाणे त्याचा उजेड पडतो आहे. या ड्रोन कॅमेरेचे बरेच व्हिडिओ गावातील व्हाट्सअॅप ग्रुपवर फिरताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिगवण व आसपासच्या परिसरात दिवसा मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोडी करून मौल्यवान वस्तूंच्या चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान या परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे घरासमोरून फिरत असल्याचे अनेक नागरिकांना दिसले आहे. चोरटे ड्रोन कॅमेरा चा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत हे तर तपासत नाही ना ? हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी ते ड्रोन कॅमेरा चा वापर करीत असावेत अशी शंका नागरिक उपस्थित करत आहे. हे ड्रोन कॅमेरे आहेत का आणखी दुसरे काही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकारांचा पोलीसांनी छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी ही तक्रारवाडी गावात पाण्याच्या टाकीजवळ चोर दिसून आल्याचे समजल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. गावातील तरुण वर्गाने चोरांचा पाठलाग ही केला पण चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. अवकाशात ड्रोन उडताना दिसलाकी की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन दुचाकीवर बसून ड्रोन चालकाला शोधण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. या अतिउत्साही वेगात बेसावधपणे दुचाकी घसरून काही तरुण जखमी ही झाले आहेत.जे काम पोलिसांचे ते काम सध्या या तरुणांनी हातात घेतलेले पाहायला मिळत आहे. भिगवण व भिगवण परिसरात या अवकाशात फिरणाऱ्या ड्रोनसदृश्य वस्तूमुळे गल्ली गल्लीत रात्रीचे पहारे चालू झालेले पाहायला मिळत आहे.
रात्री घरावर फिरणारी ही ड्रोनसदृश्य वस्तू या चार पाच मजली असणाऱ्या इमारतींच्या बाल्कनीत सहज पणे जाऊन डोकावत आहे.त्यामुळे सोसायटी मध्ये राहणारे नागरिक हि भयभीत झाले असून लवकरच या ड्रोनसदृश्य फिरणाऱ्या वस्तूचा भिगवण पोलिसांनी शोध घेऊन नागरिकांना या भीतीतून मुक्त करावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.