पुणे : सध्या देशातील राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाने पन्नाशी ओलांडली आहे. या वाढत्या उच्चांकामुळे इतर राज्यांवरही या परिस्थितीचे परिणाम दिसत आहेत. महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेचा प्रकोप राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील सध्याचे हवामान पाहता वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तापमान कमी असेल मात्र, सूर्याचा दाह कायम राहील.
आता पुढील तीन ते चार दिवसात मान्सून केरळात, दाखल होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पुढे हे वारे लक्षद्वीप आणि त्यानंतर हळुवार गतीनं देशाचा आणखी भाग व्यापणार असून, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांतही उष्णतेची लाट आली आहे. दिल्लीतील नरेला, मुंगेशपुर येते मंगळवारी 49.9 अंश सेल्सियस तर नजफगड येथे 49.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उष्णतेचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे. या राज्यात अनेक ठिकाणी तापमान 50 अंशांच्या वर गेले आहे. चुरु येथे तर 50.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय गंगानगर येथे 49.5 तर, पिलानी येथे 49 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.