मंचर, (पुणे) : दूध पिशवी बदलून देण्याच्या कारणावरून दुकानदार बापलेकाने केलेल्या मारहाणीत एका 51 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धोंडमाळ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. 12) हि घटना घडली होती. गुरुवारी (ता. 23) रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अजित काळे (वय 51, रा. धोंडमाळ, ता. आंबेगाव) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दुकानदार बाळासाहेब शंकर आवटे (वय- 46,) आणि त्यांचा मुलगा सार्थक बाळासाहेब आवटे (वय – 21) अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मृत व्यक्ती अजित काळे यांच्या पत्नी सुलभा अजित काळे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, (दि. 12) रोजी सकाळी 10.30 चे दरम्यान बाळासाहेब शंकर आवटे यांच्या दुकानातून अजित काळे यांनी दूध पिशवी खरेदी केली. मात्र, घरी नेल्यानंतर ते दूध खराब झाले. त्यामुळे ते खराब दूध बदलून मिळावे म्हणून अजित काळे दुकानात गेले.
त्यावेळी दूध पिशवीतील दूध बदलून देण्याच्या कारणावरून अजित काळे दुकानदार बाळासाहेब आवटे व मुलगा सार्थक आवटे यांच्यात मारामारी झाली. यामध्ये अजित काळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र, सोमवारी (ता. 13) रात्री उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. गुरुवार, (23 मे) रोजी उपचारादरम्यान अजित काळे यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब व सार्थक आवटे यांनी केलेल्या मारामारीत पती अजित काळे यांचा मृत्यू झाल्याचे सुलभा काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.