पुणे : शहरात सध्या ढगाळ हवामान असून, कमाल तापमानात घट झाली पाहायला मिळत आहे. रविवारी (दि. २६) कमाल तापमानाचा पारा ३५.७ अंश, तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस होते. दरम्यान शहरात पुढील सहा दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
मुसळधार पावसानंतर सध्या वातावरण कोरडे झाले असून, ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंशावरून ३५ अंशांपर्यंत उतरला आहे. शहरात उन्हाचा चटका कायम असला, तरी ढगाळ हवामानामुळे काहिसा दिलासा मिळत आहे. हवेतील आद्रता वाढल्यामुळे तापमानात बदल होत आहे. रात्रीचा किमान तापमानातही चढउतार होत आहे. रात्रीचा उकाडा काही प्रमाणात आहे. सध्या शहरात वारे वाहत आहे. उपनगरात सर्वात जास्त तापमान मगरपट्टा येथे ३६.६ अंश सेल्सिअस होते. येत्या २७ मे ते १ जून दरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. दुपारनंतर अंशतः ढगाळ राहील. यादरम्यान, कमाल तापमानचा पारा ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.