यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कासुर्डी, नाथाचीवाडी, देवकरवाडी, डाळिंब व इतर ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहे. यवत पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटस पोलीस स्टेशन हद्दीतही गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. काल भरदिवसा पाटस – दौंड रस्त्याच्या कडेला चोरी झाली आहे.
रोहिदास नगर येथील दुपारी एकच्या सुमारास 2 ते 3 अज्ञात तरुणांनी सुनिता सोनवणे यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून एक लाख 53 हजारांची रोख रक्कम व जवळपास 3 लाख 33 हजारांचे सोने चांदीचे दागिने असा अंदाजे 4 लाख 86 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच बिरोबा वाडी येथील एकाच दिवशी घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.
पाटस – दौंड या अष्टविनायक रोडवर असलेल्या बिरोबावाडी येथील दादा येडे आपल्या कुटुंबासह रात्री आपापल्या खोलीत झोपले होते. तेव्हा घरामध्ये रात्री अचानक कोणीतरी पळत असल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी खोलीच्या बाहेर येऊन पाहिले असता दोन अनोळखी व्यक्ती घराच्या मुख्य दरवाजा मधून पळत जाताना दिसून आले व लाकडी कपाट उघडे झाले असून त्यातील पाहणी केले. त्यामधील सोने चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर शांतीलाल बाबाजी वायाळ यांच्या घरातील सोन्या चांदीच्या दागिने व रोख रक्कम एक लाख रुपये आज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची घटना घडली. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यातच आज भरदिवसा पुन्हा पाटस – दौंड रस्त्याजवळच वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यवत पोलिसांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.