अलिबाग : ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाळा अशा बदलत्या वातावरणाचा फटका रायगड जिल्ह्यातील रब्बी हंगामातील भातशेतीला बसू लागला आहे. ऐन भात कापणीच्या वेळी हे संकट आल्याने कालव्याच्या पाण्यावर येणारे हे पीक वाचवायचे कसे, या चितेने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात माणगाव, रोहा, कर्जत आणि खालापूर या ४ तालुक्यांत उन्हाळी भात पीक घेतले जाते. एकट्या माणगाव तालुक्यात साधारणतः ८०० हेक्टर जागेवर रब्बी हंगामातील भात शेतीचे पीक घेण्यात आले आहे. सलग चौथ्या वर्षी शेतकऱ्यांना विघडलेले हवामान, अवकाळी पाऊस व वादळ यांचा सामना करावा लागत आहे. मागील आठवडाभर झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
उन्हाळी भात शेती कापणीसाठी तयार झाली आहे. काही भागांत शेतकऱ्यांनी भात शेती कापण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, तसेच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे भात शेती कापणीवरच संकट आल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. कडक उन्हामुळे कापणीस आलेली भात शेती करपण्याचा धोका निर्माण झाला असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळीमुळे शेतीचे नुकसान होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा असून, वाढलेली मजुरी परवडत नसल्याने कापणी करताना अनेक अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.