फर्रूखाबाद : उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा जिल्ह्याच्या एका मतदान केंद्रावर कथितरीत्या भाजप उमेदवारासाठी ८ वेळेस बोगस मतदान केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित मतदान केंद्रावरील सर्व सदस्यांना निलंबित करण्याचे आणि या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपवर टीकास्त्र डागत आयोगाकडे योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात एटातील खिरिया पमारानच्या मतदान केंद्र ३४३ वर सरपंच अनिल ठाकूर यांच्या सुपुत्राने जवळपास ८ वेळेस भाजपला बोगस मतदान केले. इतकेच नाही तर त्याने याचा व्हिडिओ बनवून सोशल माध्यमावर टाकला. याप्रकरणी राजकीय दबाव वाढल्यानंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. संबंधित मतदान केंद्रावरील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आणि त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अगर चुनाव आयोग को लगे कि ये गलत हुआ है तो वो कुछ कार्रवाई ज़रूर करे, नहीं तो…
भाजपा की बूथ कमेटी, दरअसल लूट कमेटी है। #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/8gwJ4wHAdw
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 19, 2024
तसेच संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी दिली. तत्पूर्वी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी बोगस मतदानासंबंधीचा व्हिडिओ सोशल माध्यम ‘एक्स’वर टाकत आयोगाला कारवाई करण्याचे आवाहन केले होते. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यादव यांची पोस्ट शेअर करत भाजपवर टीका केली.