पुणे : येथील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणींचा मृत्यु झाला. याप्रकरणी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु याच घटनेसंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनारजिस्ट्रेशन च रस्त्यावर धावत असल्याची माहिती समजली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर कारची मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र नोंदणी करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न अनेकांना पडले आहे.
यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने बोलताना सांगितले की, मी कार चालविण्याचे अजुनही प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही. तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार मला चालविण्यासाठी दिली आहे. तसेच मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, ही माहिती पोलिसांनी चौकशी करताना त्याने सांगितले.
अपघात झाला त्या पोर्शे कारची किंमत ₹ 88.06 लाख पासून सुरू होते आणि भारतात ही किंमत 1.86 कोटींपर्यंत जाते . सर्वात कमी किंमतीची कार Macan मॉडेलची आहे. जिची किंमत ₹ 88.06 लाख आहे. पोर्शेची सर्वात महागडी कार 911 आहे ज्याची किंमत 1.86 कोटी रुपये आहे. भारतातील पोर्शे SUV मध्ये Macan, Cayenne आणि Macan Turbo EV यांचा समावेश आहे.