नेवासा : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. म्हशींच्या धारी व इतर कामे उरकून शेतकरी कुटुंब बाहेर बसले. शेतकऱ्याची पत्नी मात्र गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजून शेजारीच असलेल्या कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या. तितक्यात घराच्या विद्युत मिटरची वायर तुटून तिचा स्पर्श पत्र्याच्या गोठ्याला झाला. क्षणातच गोठ्यातील नऊ म्हशींचा विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. चाऱ्याचे घमिले आणण्यास शेतकऱ्याची पत्नी कडबा कुट्टीकडे गेली होती, म्हणून त्या सुदैवाने बचावल्या; पण नऊ म्हशी मृत्युमुखी पडल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी नेवासे तालुक्यातील भेंडे बुद्रुक येथे घडली.
ज्ञानदेव शिरसाठ हे आपली पत्नी, मुलगा आणि सून, दोन नातवंडासह राहतात. त्यांच्याकडे १२ म्हशी असून त्यातील दुधावर त्यातून मिळणाऱ्या पैशात त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, त्यांच्या म्हशी मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. म्हशीसाठी चारा आणण्यासाठी कुट्टीमशिनकडे गेलेल्या त्यांच्या पत्नी दैव बलवत्तर म्हणून त्या संकटातून वाचल्याने मोठा अनर्थ टळला. एका म्हशीची किंमत किमान सव्वालाख रुपये एवढी आहे. असा सुमारे साडे अकरा लाख किंमतीच्या नऊ म्हशी एका क्षणातच गेल्याने शिरसाठ कुटुंबीय हाताश झाले आहे. शिरसाठ कुटुंबियांवर ओढवलेल्या आपत्तीमुळे भेंड्यासह परिसरातील नागरिक हळहळ करत आहेत.