यवत: बालसंगोपन योजनेअंतर्गत १५ मे रोजी ३७ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३ लाख ३३ हजार जमा झाले आल्याची माहिती लाभार्थी व सुवर्णकन्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास नागवडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील अनेक मुलांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केली आहे. अनाथ मुलांना पैश्यांअभावी कधीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना योजनेअंतर्गत दरमहा पैसे दिले जातात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. बाल संगोपन योजना ही सर्व प्रकारच्या अनाथ मुलांसाठी बनलेली योजना असून अनाथ मुले, घटस्फोटीत कुटुंबातील मुले व तसेच अचानक आलेल्या संकटात ज्यांनी आपले आई-वडील गमावले आहेत, अशा मुलांना या योजनेचा लाभ होतो.
सुवर्णकन्या फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून १३ डिसेंबर २०२३ रोजी ३८ बालकांना लाभ मिळाला आहे. यातील सर्व लाभार्थी बालक व पालक यांचे व्हेरिफिकेशन चार वरिष्ठ न्यायाधीशांच्या मार्फत झाले व सर्वच्या सर्व ३८ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका लाभार्थी मुलाचे निधन झाले आहे. त्यानुसार १५ मे २०२४ रोजी इतर ३७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शासनाने जानेवारी ते एप्रिल पर्यंतचे दरमहा २२५०/- रुपये प्रमाणे ४ महिन्यांचे प्रत्येकी ९ हजार रुपये जमा केले असल्याची माहिती विलास नागवडे यांनी दिली.
तसेच सुवर्णाकन्या फाउंडेशन संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये बालसंगोपन योजनेची सर्वात मोठी आणि पहिली मोहीम काढून यशस्वीपणे पार पाडली आहे. यापुढील काळात तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांसह कार्यालयातील अधिकारी यांचे सहकार्य लाभले असल्याचे नागवडे यांनी सांगितले