हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसांपूर्वी झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा उलगडा करण्यात हडपसर पोलीसांना यश आले आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दारु पित असताना 100 रूपये मागितल्याच्या कारणावरून आरोपीने लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण करून खून केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.
राजेंद्र रामभाऊ शेजुळ, (वय 35, रा. कडवस्ती, कोंढवा, पुणे, मूळ गाव बुलढाणा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सिताराम सोनकर, वय 25 वर्षे, धंदा मजुरी, रा. माऊलीनगर, कात्रज, पुणे मुळगाव- मथुरा विलासपुर, पोलीस ठाणे गौराचौराह, जि. बलमरापुर, उत्तरप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 12) सायंकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास रिदम सोसायटी समोरील मोकळया जागेत, हांडेवाडी सय्यद नगर रोडच्या बाजुला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याअनुषंगाने हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मयताची नोंद करण्यात आली होती. तसेच वैद्यकीय अधिकारी ससून हॉस्पिटल यांनी सोमवारी (ता. 13) शवविच्छेदन केले असता मयत इसमास डोक्यात व शरीरावर मारहाण झाल्याने ती व्यक्ती मृत झाल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत असताना मृत व्यक्तीची माहिती घेत असताना मृत व्यक्ती हा अमृतसरी तडका, कडनगर येथे हेल्पर म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मृत व्यक्तीचे नाव हे राजेंद्र शेजुळ असल्याचे समजले. त्यावरून त्याचे नातेवाईकांचा शोध घेवून पत्नी भाग्यश्री शेजुळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खुनी आरोपीचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, पीओपीचे काम करणारा राजेश सोनकर याचे व मृत इसमासोबत दारु पिण्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. अशी माहिती मिळाली. त्यावरुन राजेश मानकर याचा कात्रज परीसरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजेश सिताराम सोनकर असे सांगितले. खुनाबाबत चौकशी केली असता सोबत दारु पित असताना राजु याने 100 रूपये मागितल्याच्या कारणावरून राजेश सोनकर यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात मृत व्यक्ती राजु यास लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मंगल मोढवे, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते, पोनि. (गुन्हे), यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदनं, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतयाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरुध्द मानवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.