आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी काहीना काहीतरी केलं जातं. त्यात दातांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. मात्र, याच दातातील कीड, पिवळेपणा जाणवल्यास काय करावं अन् काय नको हेच बहुदा समजत नाही. पण, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.
पिवळे दात शुभ्र करण्यासाठी तुम्ही नारळ तेलाचा वापर करू शकता. यासाठी नारळ तेल घेऊन पाच मिनिटे ते दातांवर लावून ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या टूथब्रशमध्ये काही थेंब नारळाचे तेल टाकून त्याने ब्रश करू शकता. यानंतर तोंड स्वच्छ धुवा. तुम्ही जर दररोज केले तर तुमच्या दातांवरील पिवळेपणा काही दिवसांतच दूर होईल. तसेच दातांवर लिंबाची साल काही वेळ चोळावी आणि नंतर तोंड स्वच्छ धुवा. त्याचबबरोबर तुम्ही लिंबाच्या सालीची पावडर तयार करू शकता. ही पावडर तुम्ही दातांवर लावून काही वेळ ठेवू शकता. यामुळेही दातांचा पिवळेपणा दूर होईल.
याशिवाय, बऱ्याचदा दातांच्या शुभ्रतेसाठी बेकिंग सोडा फायदेशीर मानला जातो. यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. असे केल्याने अवघ्या काही मिनिटांतच आपले दात चमकदार होऊ शकतील.