पुरंदर: पुरंदर तालुक्यातील वाल्हे हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ दारू पार्टीत मग्न झालेल्या तिघांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार १४ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पवन संभाजी शेलार (वय २३ रा. पिंगोरी) व त्याचे मित्र तुषार शरद यादव, विकास अर्जुन भोसले (दोघे रा. पिंगोरी) आणि अविनाश आत्माराम पवार (रा.आडाचीवाडी) यांच्या समवेत वाल्हे हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ मद्य प्राशन करत बसले होते.
यावेळी पैशाच्या कारणास्तव वाद निर्माण झाल्याने तुषार यादव, विकास भोसले आणि अविनाश पवार या तिघांनी मिळून पवन शेलार याला मातीच्या विटांसह दारूच्या बाटलीने मारहाण केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या पवन शेलार याला उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल करण्यातआले. परंतु, शेलार याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुगणालयात भरती करण्यात आले होते. मात्र, ससूनमध्ये उपचारादरम्यान पवन शेलार याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी ईश्वरी संभाजी शेलार (रा. बारसुडे नगर, जेजुरी) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर आरोपी विकास भोसले आणि अविनाश पवार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार यादव हा फरार झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दर्शन दुगड तसेच जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करीत आहेत.