नवी दिल्ली : सध्या हल्दीराम कंपनी ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. हल्दीराम कंपनीच्या उत्पादनामुळे तिला चांगले यश मिळत आहे. आता हीच कंपनी लवकरच परदेशात जाऊ शकते. ‘अबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि जीआयसी सिंगापूर’सह जगातील सर्वांत मोठी खाजगी इक्विटी फर्म, ब्लॅकस्टोन हल्दीराममधील हिस्सा विकत घेणार आहे.
गेल्या आठवड्याच्या अखेरीस कन्सोर्टियमने हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेड (एचएसएफपीएल) मधील हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. हल्दीराम या कंपनीचा मोठा इतिहास आहे. 87 वर्षांची हल्दीराम ही भारतातील सर्वात मोठी स्नॅक्स आणि सुविधा देणारी कंपनी आहे. ब्लॅकस्टोन आणि त्याच्या भागीदारांना हल्दीराममधील 74 ते 76% हिस्सा खरेदी करण्यात रस आहे. त्याचे मूल्य 8-8.5 अब्ज डॉलर्स (66,400-70,500 कोटी) ठेवले आहे.
‘हल्दीराम’च्या गंगा बिसन अग्रवाल यांनी 1937 मध्ये हल्दीराम ब्रँड सुरू केला. सध्या कंपनीचा 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे. हल्दीराम सुमारे 400 प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करतात. यामध्ये स्नॅक्स, नमकीन, मिठाई, फ्रोझन फूड, बिस्किटे, रेडी टू ड्रिंक बेव्हरेजेस, पास्ता, कन्फेक्शनरी आणि रेडी टू इट फूड यांचा समावेश आहे. कंपनी आपली उत्पादने अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये निर्यात करते.