उरुळी कांचन, (पुणे) : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीला परिश्रमाची जोड देत, जोखीम पत्करत टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील शेतकरी संतोष राऊत यांनी त्यांच्या दीड एकर शेतात मक्याचे साडेतीन महिन्यात तब्बल 35 टन उत्पादन घेतले आहे. मका लावण्याचा त्यांचा निर्णय यावेळी फलदायी ठरला आहे. सध्या मका मळणीचा हंगाम सुरु असून मका पिकाच्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
टिळेकरवाडी येथील शेतकरी संतोष राऊत यांनी मका पिकाच्या शेतीतून लाखोंची कमाई करत आपले अर्थकारण बदलले आहे. शेतीत कष्ट व थोडे नियोजन केले असता यश हमखास मिळू शकते हे शेतकरी राऊत याने दाखवून दिले आहे. विकल्या गेलेल्या मका पिकाला यावर्षी 3 हजार 200 रुपये बाजारभाव मिळाला आहे.
उरुळी कांचन येथील एका खत दुकानातून राऊत यांनी ऍडवंटा कंपनीची ए.डी. व्ही हे मक्याचे बियाणे आणले होते. मका लावण्यापासून मक्याला तीन फवारण्या करण्यात आल्या. लष्कर आळीचा प्रादुर्भाव कमी झाला व पती -पत्नी यांनी मोठ्या कष्टाने साडेतीन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहे. साधारण मका काढण्यापर्यंत 50 ते 55 हजार रुपये खर्च आला आहे. तर त्यांना एकूण उत्पन्न हे 1 लाख 12 हजार रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. यामुळे उत्पादक लखपती बनले आहेत.
शेतीकडे वजाबाकीचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. पाणी, मनुष्यबळ व आर्थिक टंचाईमुळे शेतीकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणांची संख्या अधिक दिसते. चिकाटीतून शेती कशी किफायतशीर ठरू शकते हेही राऊत यांनी दर्शविले आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात ऊस तोडणी झाल्यानंतर मोकळ्या झालेल्या शेतीत दोन तीन महिन्यांत हमखास येणारे पीक म्हणून मकाकडे पाहिले जाते. पाणी पातळी एप्रिल मे महिन्यात कमी होणारच असे गृहीत धरून पूर्व हवेलीतील टिळेकरवाडी हिंगणगाव, शिंदेवाडी, भवरापूरसह भागातील अनेक शेतकरी मका पिके घेतात.
टिळेकरवाडी येथील मका उत्पादक शेतकरी संतोष राऊत म्हणाले, आम्ही दीड एकर क्षेत्रात मका हे पीक घेतले होते. त्याला 50 ते 55 हजार खर्च आला आहे. योग्य नियोजन व तीन फवारण्या केल्यामुळे तीन महिन्यात 55 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे.