लोणी काळभोर (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मातोश्री ऑटो गॅरेजच्या २७ वर्षीय तरुण मालकाने स्वत:च्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पवन उर्फ पांडुरंग शंकर कांबळे (वय- २७, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मातोश्री ऑटो गॅरेज नावाने पवन कांबळे यांचे गॅरेज आहे. पवन कांबळे यांचा आज सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गॅरेजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी त्वरित हि माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने पवन कांबळे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. पवन कांबळे यांचे मागील एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. पवन कांबळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.