राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्यात चोरी व मारहाण झालेली तक्रार देण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या बारा हजार रुपयांसाठी कुठे एवढी पळापळ करायला लावता असं उत्तर यवत पोलिसांनी दिले आहे. तसेच गेलेली कागदपत्रे तुम्हाला नव्यानी काढता येतील. आम्हाला येऊन चौकशी करु द्या, असं म्हणत अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नसल्याची माहिती डाळिंब (ता. दौंड) येथील माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील डाळिंब गावचे माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांचे उरुळी कांचन येथे विठोबा ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी (ता. 08) त्यांच्या घरी झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरातील महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी चोरून नेली. त्यामध्ये खरेदीखत, जात प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील साडेबारा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यानी पळवली.
तसेच नारायण बाळकृष्ण गायकवाड त्यांच्या पत्नी बाहेर झोपलेले असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवण्याचा प्रयत्न देखील चोरांनी केला होता. यावेळी तेथील राहुल काळू म्हस्के हे बाथरूमसाठी गेल्याने त्यांच्या घराचे दार उघडे होते. त्यामुळे चोरट्यांनी बाहेरील बल्ब काढून घरामधील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला.
तसेच राहुल म्हस्के यांच्या मागे दोन चोरटे धारदार शस्त्र घेऊन पळाले. यावेळी गायकवाड यांनी आरडाओरड करून पळ काढला. त्यावेळी चोरट्यानी त्यांना दगड फेकून मारला. यामध्ये त्यांच्या बरगडीला जोराचा मार लागला. त्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चोरांनी पळ काढला.
दरम्यान, सदर घटनेबाबत यवत पोलीस ठाण्यात काळे हे गेले असता आम्हाला येऊन चौकशी करुद्या, तुमच्या बारा हजार रुपयांसाठी कुठे एवढी पळापळ करायला लावता. गेलेली कागदपत्रे तुम्हाला नव्यानी काढता येतील, असे उलट उत्तर यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिले असल्याची माहिती माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांनी दिली.
उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक रात्रीच्या सुमारास बाहेर झोपलेले असतात. यावेळी बाहेरून दरवाजाला कुलूप लावून झोपावे व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना केल्या पाहिजेत. अशा काही चोरीच्या घटना किंवा संशयस्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा.
नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, (यवत पोलीस ठाणे)