अहमदनगर : पुणे, मावळ, शिरूरसह अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्शवभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुजय विखे तर, महाविकास आघाडीकडून निलेश लंके मैदानात उतरले आहेत.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतोच. तू खासदार कसा होतो, ते बघतोच, अशा शब्दात अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, पारनेर विधानसभेसाठी उमेदवार शोधत असताना माझ्या जवळच्या लोकांनीच मला निलेश लंकेची भेट घालून दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेखातर मी निलेश लंकेला उमेदवारी दिली. पण मला वाटलं नव्हतं हा बाबा नंतर दिवे लावेल. गडी दिसायला बारीक, पण लई पोहोचलेला आहे. त्याला विकासकामांसाठी खूप निधी दिला. मला वाटायचं गरीब घरातला आहे. चांगलं काम करतोय. पण नंतर मला त्याची लक्षणं कळायला लागली, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांनाही खुलेआम धमक्या देण्याचा प्रकार निलेश लंके यांनी केला. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे लंके धमक्या देत होते. मी उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना अतिशय नम्रतेने बोलतो. त्यांना आदर देतो. पण हा पठ्ठ्या तर ऐ कलेक्टर इकडं ये असं बोलायचा.
पोलिसांशी बोलताना मी तुमचा बाप बोलतोय, अशा धमकीच्या स्वरात बोलायचा. अरे निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो, तर तुझा कंड असा जिरवीन की तुला सतत अजित पवारच दिसेल, असं अजित पवार म्हणाले.
तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती आहे. तू फार शहाणपणा करू नको. मी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत राहतो. जर तू आमच्या माणसाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर तुला बघून घेईन. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा, असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आचारसंहिता संपल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेईन. आता तर तो आमदारही नाही. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झाला आहे. त्यामुळे त्याची अरेरवी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नये. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नये. मात्र कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका. निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.