तळेगाव ढमढेरे : गॅरेजमधील दहा लाखाच्या आसपास असलेल्या स्पेअर पार्टच्या साहित्यासह रक्कम चोरल्या प्रकरणी तळेगाव ढमढेरेच्या पोलीस पाटलासह तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष सोपान जगताप (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग विश्वनाथ नरके, भानुदास बबन जाधव, दिनकर बबन जाधव, संजय बबन भुजबळ (सर्व रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सुभाष जगताप यांचे जगताप गॅरेज नावाने दुचाकी दुरुस्तीचे दुकान असून सुभाष जगताप हे ऑक्टोबर २०२३ मध्ये गॅरेज उघडण्यासाठी गेले असताना गॅरेजचे कुलूप बदलेले असल्याचे दिसले. त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन येथे अर्ज दिला होता. त्यांनतर जगताप हे सदर दुकानाकडे गेले असताना त्यांना गॅरेज उघडे दिसले. दरम्यान चौकशी केली असता सदर गॅरेजचे कुलूप पोलीस पाटील पांडुरंग नरके व त्यांच्या सहकार्यांनी तोडून पिकअप वाहनातून गॅरेज मधील सर्व साहित्य तसेच एक लाख रुपये रोख असा तब्बल १० लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.