पुणे : शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत असलेल्या तरुणीने तिच्यासोबत राहणाऱ्या तीन मैत्रिणींचे नकळत कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या प्रियकरास पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलो. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी व तिचा प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विनीत अजित सुराणा (सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि त्याची मैत्रीण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे शिवाजीनगर येथे मुलींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी आरोपी तरुणी शिक्षण घेत असल्याने राहण्यास होती. तिच्या खोलीत तीन मैत्रिणी राहण्यास होत्या. २४ जानेवारी २०२३ ते ३ मे २०२४ दरम्यान आरोपी मुलीने तिच्या साथीदार मुलींचे संमतीशिवाय मोबाइल फोनमध्ये कमी कपड्यातील व्हिडिओ शूटिंग करून ते प्रियकर विनीत सुराणा यास मोबाईलवर पाठवले. आरोपी मुलीच्या रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी मुलींना संबंधित मैत्रीण सतत मोबाईलवर तिच्या प्रियकराशी बोलताना दिसून येत होती. आक्षेपार्ह व्हिडिओबाबत ती त्याच्यासोबत बोलत असताना, एका मैत्रिणीने ही गोष्ट ऐकली. तिने मैत्रिणीचा मोबाइल तपासला असता, त्यात तिच्यासह इतर मैत्रिणींचे कमी कपड्यातील, कपडे बदलतानाचे फोटो, व्हिडिओ तिने प्रियकरास पाठविल्याचे निष्पन्न झाले. ही घटना उघडकीस येताच, तिच्यासह प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला.