हदगाव : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एका 27 वर्षीय विवाहितेला जबरदस्तीने विषारी औषध पाजून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
केदारगुडा (ता. हदगाव) येथील माहेर असलेल्या विश्रांती डाखोरे या महिलेचा विवाह 9 वर्षांपूर्वी खरबी (ता. हदगाव) येथील बालाजी दत्ता डाखोरे याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. लग्नाच्या काही वर्षानंतर विश्रांती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बालाजी तिला मारहाण करत होता. मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याने तिने ही गोष्ट माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली होती. यानंतर दोन्ही गावच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी समजूत घालून नांदायला पाठवण्यात आले.
2023 मध्ये प्लॉट घेण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी तिच्याकडे सुरू झाली. मात्र, माहेरची परिस्थिती ठीक नसल्याने ती पूर्ण केली गेली नाही. यावर्षी त्यांना घरकुल योजनेतील घर मंजूर झाले होते. त्यासाठी पुन्हा 50 हजार रुपये घेऊन ये, नाहीतर तुला संपवतो, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, पैसे आणण्यास असमर्थता दाखवल्याने पतीने पत्नीला जबरदस्तीने विषारी औषध पाजले. इतकेच नाहीतर तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी विश्रांतीची आई लक्ष्मीबाई नामदेव भिसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती बालाजी दत्ता डाखोरे, शीलाबाई दत्ता डाखोरे आणि शिवाजी राघोजी खानदोडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.