नवी दिल्ली: गेल्या 65 वर्षांत देशातील हिंदूंची लोकसंख्या 8 टक्क्यांनी कमी झाली आहे, तर या काळात मुस्लिम लोकसंख्या 9.84 टक्क्यांवरून वरून 14.09 टक्के झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. देशभरातील ‘शेअर ऑफ रिलिजिअस मायनॉरिटीज’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात पारशी आणि जैन समुदाय वगळता भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्याकांची एकूण लोकसंख्या 6.58 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
देश स्वतंत्र झाल्यापासून 1950 ते 2015 या काळात हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. हिंदू लोकसंख्या 1950 ते 2015 दरम्यान 7.82% ने घटली. मुस्लिम लोकसंख्येमध्ये एकूण 43.15% वाढ झाली आहे. 1950 मध्ये 9.84% असलेली मुस्लिमांची लोकसंख्या 14.09% वर पोहोचली आहे. त्याचवेळी, ख्रिश्चन धर्माच्या लोकांची लोकसंख्या 2.24% वरून 2.36% पर्यंत वाढली आहे. तसेच शीख समुदायाची लोकसंख्या 1.24% वरून 1.85% झाली आहे.
65 वर्षात कोणत्या धर्माची लोकसंख्या किती वाढली किंवा कमी झाली?
अहवालात असे म्हटले आहे की, 1950 मध्ये भारतातील हिंदू लोकसंख्या 84.68% होती, जी 2015 पर्यंत 78.06% वर आली आहे. या कालावधीत, मुस्लिम लोकसंख्येचा वाटा 1950 मध्ये 9.84% वरून 2015 मध्ये 14.09% पर्यंत वाढला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या तीन वर्षांनंतर, देशातील ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या 2.24% होती, जी 2015 मध्ये वाढून 2.36% झाली. 1950 मध्ये, देशातील शीख समुदायाच्या लोकांची संख्या 1.24% होती, ज्यात वाढ झाली आणि 2015 पर्यंत ती 1.85% पर्यंत पोहोचली.
या काळात बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्याही वाढली आहे. बौद्ध लोकसंख्येमध्ये 1950 च्या 0.05% वरून 2015 पर्यंत 0.81% पर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु, जैन समाजाची लोकसंख्या 0.45% वरून 0.36% पर्यंत कमी झाली, तर पारशी लोकसंख्या 0.03% वरून 0.004% पर्यंत पोहचली.
देशातील धार्मिक लोकसंख्येचा अहवाल कोणी तयार केला ?
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात देशातील धार्मिक लोकसंख्येची माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल शमिका रवी, अपूर्व कुमार मिश्रा आणि अब्राहम जोस यांनी तयार केला आहे. देशात सामाजिक विविधतेला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शमिका रवीने त्यांच्या पेपरमध्ये म्हटले आहे की, अल्पसंख्याकांची कायदेशीर व्याख्या असलेल्या काही देशांपैकी भारत एक आहे. त्यांच्यासाठी घटनात्मकदृष्ट्या संरक्षित अधिकार प्रदान केले आहेत. या प्रगतीशील धोरणांचे आणि सर्वसमावेशक संस्थांचे परिणाम भारतातील अल्पसंख्याक लोकसंख्येच्या वाढत्या संख्येत दिसून येतात.
पाकिस्तानसह भारताच्या शेजारी देशांची स्थिती काय?
बहुसंख्य समाजाची लोकसंख्या घटण्याबाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पहिला क्रमांक म्यानमारचा आहे, जिथे गेल्या 65 वर्षांत बहुसंख्य समाजाच्या लोकसंख्येमध्ये 10% घट झाली आहे. भारतीय उपखंडाबाबत असे म्हटले जाते की, मालदीव हा एकमेव मुस्लिम बहुसंख्य देश आहे, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या घटली आहे. मालदीवमधील बहुसंख्य गटाचा वाटा 1.47% ने घसरला.
त्याच वेळी, बांगलादेशातील बहुसंख्य धार्मिक गटाचा वाटा 18% ने वाढला, जी भारतीय उपखंडातील सर्वात मोठी वाढ आहे. बांगलादेशात मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो, तर पाकिस्तानमधील बहुसंख्य धार्मिक लोकसंख्येच्या वाट्यामध्ये 3.75% आणि एकूण मुस्लिम लोकसंख्येमध्ये 10% वाढ झाली आहे.