उरुळी कांचन : गेली तेरा वर्षे बंद पडलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना कुणालाही सुरू करता आला नाही. तो सुरू करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार. माझ्यावर आरोप होतात की अजित पवार कारखाने बंद पाडतो. उलट मी बंद पडलेले साखर कारखाने चालू करतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. याप्रसंगी प्रदीप कंद, अपूर्व आढळराव पाटील उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, सर्वांत जास्त चर्चेतील मतदारसंघ म्हणून शिरूर-हवेली ओळखला जातो. या मतदारसंघात विद्यमान खासदारांनी एक रुपयाही निधी आणला नाही. जनतेला वाली हवा आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काहीच काम केलं नाही. हडपसर, पुणे-सोलापूर महामार्ग येथील वाहतूककोंडीचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल त्यांनी उपतस्था केला.
अजित पवार म्हणाले की, कलाकारांना सामाजिक प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते. ते विविध भूमिका करत असतात. त्यांच्याकडे लोकांसाठी वेळ नसतो. सामाजिक क्षेत्रात काम करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले.