लोणी काळभोर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे व्हायला पाहिजे होती, ती मागील खासदारांनी केली नाही. कारण ते केवळ भाषण करणारे कलाकार आहेत. ते नाटकं करतात. त्यामुळे आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, तर केंद्रात मोदी सरकार निवडून यायला पाहिजे. तुमच्या सर्व समस्या व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रवित्र मत द्या, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखीस्थळावर सभेचे आयोजन मंगळवारी (ता.७) करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, मंगलदास बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३५ हजार हजार रुपयाची कर्जमाफी २०१४ मध्ये केली, त्यानंतर सत्तेत आम्ही असताना २७ हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहोत. मी स्वतः शेतकरी आहे. मला शेती करायचा नाद आहे, दुसरा कुठला नाद नाही. काँग्रेसने मागासवर्गीय लोकांचा विकास केला नाही, त्यांनी स्वतः बाबसाहेब आंबेडकर असतानाही नेहमीच विरोध केला, संविधान बदलण्याचा खोटी अफवा पसरवली जात आहे. पंडित नेहरू पासून ते आत्तापर्यंत अनेकांनी घटनेतील काही कलमांमध्ये बदल केला आहे. म्हणजे घटना बदलली असे होत नाही.
लोकसभा निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या शिखरावर आहे. मोदी यांच्या उज्वल भारत देशाचा एक भाग म्हणून राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. या हेतूनेच आम्ही भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या भागातून एक खासदार दिल्लीत पाठविला तर निश्चित आपल्याला भागातील कामे होण्यास त्याचा उपयोग होणार आहे. सत्ता नसेल तर कामे होणार नाही, त्यामुळे सत्ता महत्त्वाची आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, पंधरा वर्षे मी खासदार असताना, ड्रीम प्रकल्प केले होते, पुणे नाशिक हायवे याचा मार्गसुद्धा मीच निर्माण केला होता. त्यासोबत लोणी काळभोर येथील सोळाशे कोटीचा पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आता तो अजित पवार यांनी थोडासा टेकू दिल्यास पूर्ण होईल. विरोधी उमेदवाराच्या दिशाभूल भाषणावरती विश्वास ठेवू नका, जो माणूस खिशात असलेले पैसे खर्च करू शकत नाही. तो केंद्रातले पैसे कसे आणू शकेल. त्यामुळे आपल्याला अधिक विकास कामे करण्याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे.
दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला
उरुळी कांचन येथील सभेत अजित पवार म्हणाले, आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो. डॉ. कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्या सोबत शपथविधीसाठी आले, कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता असल्याशिवाय काय खरं नाही. असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी तो एक होता. पण ज्यावेळी पहिली शपथ मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ घेण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला, असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.