सोलापूर : भरधाव इको कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पुलाला धडकून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मोहोळ- पंढरपूर पालखी मार्गावरील (Mohol Pandharpur Palkhi Route) पोखरापूर शिवारात मंगळवारी (ता. 07) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
या अपघातात सोमनाथ शिवाजी डवरी (वय 40), रेणुका सुरेश कासार (वय 45), नवनाथ अनिकेत जाधव (वय 7), दिलीप हरिनाथ कोष्टी (वय 60), सीता दिलीप कोष्टी (वय 55) असे अपघातात मृत्यू झालेल्या पाचजणांची नावे आहेत.
श्रावणी सुरेश डवरी (वय 16), महेश दिलीप कोष्टी (वय 24), निकिता महेश कोष्टी (वय 19), आकाश प्रेश जोगी (वय 21, रा. वडाळा), अश्विनी अनिकेत जाधव (वय 25 रा. कोर्टी अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुरेश शिवाजी डवरी (वय 41 रा. वडाळा ता. उत्तर सोलापूर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून इको कारचा चालक अनिकेत अंक्श जाधव (वय 29 रा. कोटीं) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील महेश दिलीप कोष्टी (वय २४, रा. वडाळा) याचे लग्नकार्य नुकतेच झाले होते. एका एको कार (एम. एच. १३. २८१९) मधून नव दाम्पत्य महेश कोष्टी, पत्नी निकिता कोष्टी, आई सीता कोष्टी, वडिल दिलीप कोष्टी, श्रावणी डवरी (वय १६), आकाश प्रेश जोगी (वय २१, सर्व रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर), चालक अनिकेत अंकुश जाधव (वय २९), पत्नी अश्विनी अनिकेत जाधव (वय २५, दोघे रा. कोर्टी), मुलगा नवनाथ जाधव, सोमनाथ डवरी, नातेवाईक रेणुका कासार हे सारे जण ज्योतिबाच्या दर्शनासाठी रविवारी (ता. ०५) सायंकाळी कारमधून कोल्हापूर येथे गेले होते.
दर्शन घेऊन परत माघारी येताना मोहोळ- पंढरपूर पालखी मार्गावरील पोखरापूर शिवारात आली असता भरधाव इको कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पुलाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये वरील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार आणि त्यांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
दरम्यान, जखमींना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तेथे उपचार न होऊ शकल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. कारचालक अनिकेत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्यास पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.