मुंबई : रस्त्यावरील अनधिकृत स्टॉलवर चिकन श्वार्मा खाल्ल्याने मानखुर्दमध्ये १२ जणांना विषबाधा होऊन यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रथमेश भोकसे (१९) असे मृताचे नाव असून तो मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरातील रहिवासी होता.
महाराष्ट्र नगर येथील मुख्य रस्त्यावर खाद्य पदार्थांचे मोठ्या संख्येने अनधिकृत स्टॉल आहेत. येथे आनंद कांबळे व मोहम्मद अहमद रेजा शेख यांचा श्वार्मा विक्रीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर प्रथमेशसह विभागातील अनेकांनी श्वार्मा खाल्ला होता. यामुळे प्रथमेशला उलटी आणि पोटदुखीचा खूप त्रास होऊ लागला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला तात्पुरते बरे वाटले. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याचदरम्यान महाराष्ट्र नगरमध्ये या स्टॉलवर श्वार्मा खाल्लेल्या इतरांच्या तक्रारीही पुढे येऊ लागल्या. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी १२ जणांनी उपचारासाठी धाव घेतल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यापैकी चार जणांची अधिकृत नोंद पोलिसांनी केली असून इतरांची माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना प्रथमेशची तब्येत अतिशय खालावली आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हा श्वार्मा खाणाऱ्या इतर चार जणांवरही विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.