यवत: बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत या संवेदनशील गावात मतदान शांततेत पार पडले. एरव्ही मतदानासाठी स्थानिक नेत्यांत असणारी चढाओढ न होता, कार्यकर्त्यांत एकजूट पाहायला मिळाली. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेकांनी सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्राकडे धाव घेतली होती. बाहेरगावी व शेतीच्या कामाला जाणाऱ्या नागरिकांनी लवकर मतदान करणे पसंत केले. सकाळी ११ वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मतदारांची वर्दळ कमी होती. दुपारी ४ नंतर यवत व यवत परिसरातील मतदारांत उत्साह पाहायला मिळाला. यावेळी यवत येथील तृतीयपंथीयांनी देखील मतदानाचा हक्क बजावला व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एरव्ही निवडणुकीत मतदानासाठी स्थानिक नेत्यांत असणारी चढाओढ व इर्षा न होता भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची झालेली युती व आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यात झालेल्या मनोमिलनामुळे प्रथमच कार्यकर्त्यांत एकोपा दिसून आला. मागील वेळेस मतदान करूनही यावेळी मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यवत येथे जवळपास ५८ % मतदान झाले असून एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरला. कमी होणारी मतांची टक्केवारी कोणाला तारणार आणि कोणाला फटका देणार हे पाहावे लागणार आहे.