अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.5) मोर्शी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मंगेश भीमराव कापसे (वय 27) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मंगेशने पीडित 21 वर्षीय तरुणीला मोबाईलवर कॉल करून गावाच्या बाहेर भेटायला बोलावले. त्यानुसार ती त्याला भेटायला गेली. त्यावेळी ‘मी तुला न्यायला आलो आहे. तू माझ्यासोबत गावाला चल, आपण दोघे लग्न करू’, अशी बतावणी त्याने तिला केली. त्यानंतर दोघेही दुचाकीने मोर्शी येथे गेले. दरम्यान, आता रात्र झाली आहे, तू माझ्या गावी घरी चल, असे मंगेश तिला म्हणाला. त्यामुळे ती मंगेशसोबत त्याच्या घरी गेली. रात्री 11 वाजताच्या सुमारास ती त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी मंगेशचे कुटुंबीय झोपलेले होते. त्यामुळे त्याने तिला पोटमाळ्यावर झोपायला सांगितले.
दरम्यान, एक ते दीड तासानंतर मंगेश हा तिच्याजवळ आला. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, असे म्हणत जवळ येऊ लागला. मात्र, त्यास तरुणीने नकार दिला. तरीही मंगेशने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडित तरुणीने मोर्शी ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.