हातकणंगले : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान पार पडत असून राज्यात काही ठिकाणी गोंधळ, हाणामारी, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्यची माहिती समोर आली आहे.
वाळवा तालुक्यातील साखराळे गावात महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला आहे. यामुळे मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.
नेमकं काय घडलं ?
वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बुथ क्रंमाक ६२ आणि ६३ वर हा प्रकार घडल्याची माहिती आहे. महायुतीचे उमेदवार धर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रुपातंर हाणामारीत झाले.
मतदान केंद्र क्रमांक ६२ आणि ६३ वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धैर्यशील माने यांच्या गटाने केली होती. त्यामुळे मतदान केंद्र काहीकाळ बंद ठेवण्यात आले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले होते.
त्यावेळी दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. वाद वाढू लागल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटामध्ये हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, सादर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.