शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारल्यानंतर आज दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कशा पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते, हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केले आहे.
जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात स्वतःच्या कंपनीचा फायदा लक्षात घेत, केवळ संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारले असे सांगत, आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीच्या वेषातील व्यापारी असल्याचा आरोप केला होता. यावर आढळराव पाटलांनी डॉ. कोल्हेंना पुरावे सादर करा, असे आव्हान दिल होते. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे हे आढळराव पाटलांनी केवळ सरंक्षण खात्याविषयी विचारलेले प्रश्न जनतेसमोर मांडत आहेत.
सोमवारी, याच संदर्भातला दुसरा व्हिडीओ डॉ. कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, डायनालॉग ही आढळराव पाटलांची जी कंपनी आहे. त्या कंपनीच्या वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध आहे. संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी 29 एप्रिल 2016 ला विचारलेला प्रश्न या व्हिडीओत जनतेसमोर मांडला आहे.
भारत सरकारने संरक्षण खात्याला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे धोरण तयार केले आहे का? यामध्ये भारतीय कंपन्यांसाठी धोरण आहे का? आणि केले असेल तर त्याची सविस्तर माहीती द्यावी, असा प्रश्न आढळराव पाटलांनी विचारला होता. या प्रश्नांचा आणि शिरुर लोकसभेचा काय संबंध? याचे उत्तर आढळराव पाटलांनी द्यावे, असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
डमी उमेदवारांचा बुरखा फाडणारा पुरावा क्रमांक – २ !@ShivajiAdhalrao दादा,
जनतेच्या भावनांचा तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी व्यापार केला याचा हा आणखी एक पुरावा…
दिलेला शब्द पाळण्याची आपल्या शिवजन्मभूमीची संस्कृती आहे. आता दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण माघार घेणार का ?… pic.twitter.com/2pGGsEcvK2— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 6, 2024
आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी उत्तरं द्यावीत
निवडणूक प्रचारात माझ्याबद्दल नेता की अभिनेता हा प्रश्न अनेकजण विचारतात, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी उत्तर द्यावीत की, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारा लोकप्रतिनिधी हवा, की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी हवा. तेव्हा आता आढळराव पाटील दिलेला शब्द पाळणार का? आणि त्यांच्यासाठी मत मागणाऱ्या नेत्यांना याची कल्पना आहे का? असे प्रतिसवाल डॉ. कोल्हे यांनी केले आहेत.