पुणे : खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात मुलाला इयत्ता पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने पालकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी (दि. ४ मे) उघडकीस आला. पैसे परत मागितल्याने आरोपीने तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. शीतल प्लाझा, कात्रज- कोंढवा रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पालक एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराची आरोपी घाटपांडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. खडकवासला परिसरातील गिरीनगर केंद्रीय विद्यालयात मुलीला पहिलीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार घाटपांडेला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटले. तक्रारादारकडून त्यांनी दीड लाख रुपये घेतले. तक्रारदारासह त्यांच्या ओळखीतील आणखी काही जणांचीही घाटपांडेला याने या पद्धतीने फसवणूक केली. त्याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे.