पुणे : ”पुणे तिथे काय ऊणे” असे आपण नेहमीच ऐकले आहे. मग वाहतुकीचे नियम मोडण्यात पुणेकरही कसे मागे असतील, मागील १० महिन्यांत वाहतुकीचे नियम मोडण्यात पुणेकरांना तब्बल ७३ कोटींचा दंड परिवहन विभागाने ठोठाविला आहे.
पुणे शहरात वाहतुककोंडीची समस्या मोठी आहे. वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते. मात्र, पुणेकरांनी वाहतुकीचे नियम मोडण्यात कसलीही कसर सोडलेली नाही. परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी रुपयांहून अधिक दंड पुणेकरांवर ठोठावण्यात आला आहे. यामध्ये विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या इतर नियमांपेक्षा विनाहेल्मेट दुचाकीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर गेल्या १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी २९ लाख ६८ हजार ९०० रुपये इतका दंड परिवहन विभागाने ठोठावला आहे.
दरम्यान, परिवहन विभागाने या दंडापैकी केवळी २० कोटी ७ लाख ३८ हजार ७५० रुपये दंड वसूल केला आहे. तर उर्वरीत ५३ कोटी २२ लाख २५ हजार १५० रुपये दंड वसूल करण्याचे वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यामुळे ३८ कोटी ५६ लाख दंड ठोठाविला आहे. तर नो पार्कींगच्या दंडाची रक्कम १० कोटी ६५ लाख इतकी आहे.