अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना विरोध करून खासदार सुजय विखेंना पाठिंबा देणं हे माजी आमदार विजय औटी यांना चांगलाच महागात आहे. विजय औटी यांना शिवसेना ठाकरे गटातून निलंबित करण्यात आलं आहे. विजय औटी यांनी पक्षविरोधी काम केल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने हे निलंबन करण्यात आले आहे.
अहमदनगर दक्षिण शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र जारी केले आहे. माजी आमदार विजय औटी यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखेंना पाठिंबा दिल्याने नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषदेत घेत आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सोबत म्हणजेच माजी आमदार निलेश लंके यांच्यासोबत असल्याचे सांगितले. अशातच आता माजी आमदार विजय औटी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना एकच उधाण आले आहे.