Goldy Brar : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर सतिवंदर सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार (Goldy Brar) याच्या मृत्यूचा दावा खोटा असल्याचे अमेरिकन पोलिसांनी म्हटले आहे. कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फ्रेस्नो परिसरात गोळीबाराची घटना घडली.
अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या हत्येसंबंधीचा रिपोर्ट हा पूर्णपणे खोटा असल्याचा खुलासा केला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे तो गोल्डी ब्रार नव्हता, याची आम्ही पुष्टी करतो, असे पोलीस म्हणाले. गोल्डी ब्रारच्या हत्येची अफवा कशी पसरली हे आम्हाला माहीत नाही. विविध वेब साइट्सनं आमच्याकडून कोणतीही पुष्टी न करता गोल्डी ब्रारच्या हत्येच्या बातम्या पसरवण्यास सुरुवात केली, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
कोण आहे गोल्डी ब्रार?
गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ सतींदर सिंगजीत सिंग असं आहे. गोल्डी ब्रार हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करतो. अनेक हत्या आणि शस्त्रास्त्र तस्करीतच्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे. गोल्डी ब्रार हा सध्या अमेरिकेत असून तेथून तो पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि कॅनडामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया करत आहे. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला.
सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात मानला जाणारा गोल्डी हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्यांच्या सांगण्यावरूनच बिष्णोई गँगनं सिद्धूची हत्या केली, असं म्हटलं जातं.