दिनेश सोनवणे
दौंड : दौंड क्वार्ड लाईन रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे दौंड क्वार्ड लाईन रेल्वे स्टेशन चोर-लुटारूंचा अड्डा बनला आहे का? जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
दौंड जंक्शन हे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. येथून मुंबई, कन्याकुमारी, दिल्ली-कोलकाता आणि बारामतीच्या दिशेने गाड्या जातात. प्रवास्यांच्या सेवेसाठी पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी दौंड येथे नवीन कॉल लाईन स्टेशन सुरू करण्यात आले आहे. हे स्टेशन सुरू झाल्यापासून वादातच आहे.
दौंड क्वार्ड लाईन रेल्वे स्टेशनवर शनिवारी (ता.२९) रात्री उशिराच्या गाडीने उत्तर प्रदेशातून दौंडला कामानिमित्त आलेल्या प्रवाशांना चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कॉर्ड लाईन स्टेशनवर रात्रीच्या वेळेस उतरणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीही या स्टेशन परिसरामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना चोरट्यांनी मारहाण करून लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
दरम्यान, या स्टेशनवर फक्त रेल्वे प्रवाशांनाच नाहीतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
तसेच या स्टेशनवर सर्वच प्रकारच्या सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुविधा व प्रवास्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतलीच पाहिजे. अशी मागणी सुद्धा प्रवासी करीत आहेत.
या क्वार्ड लाईन स्टेशनच्या परिसरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे वारंवारपणे तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केला नसल्याने प्रवाशांना मारहाण करून लुटण्याच्या घटनेत वाढच होत चालली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चोरट्यांच्या मारहाणीमध्ये एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासन जागे होणार आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.